
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नवीन बीअर बारच्या परवान्यासाठी सव्वातीन लाखांची लाच घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात अटक केली. रवींद्र लक्ष्मण कोकरे (वय ४९), असे अटकेतील निरीक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणात बडे मासे अडकण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. रवींद्र हे ई-विभागाचे (ग्रामीण) निरीक्षक आहेत.एसीबीच्या सूत्रांनुसार, फ्रेण्ड्स कॉलनीत राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाचा कळमेश्वर परिसरात रेस्टॉरेंट आहे. त्याला तिथे बीअरबारचा परवाना हवा होता. यासाठी युवकाने उत्पादन शुल्क विभागात अर्ज केला. पडताळणीकरून परवान्याची फाइल अधीक्षकाकडे पाठविण्यासाठी रवींद्र कोकरे यांनी युवकाकडे ४ लाखांची मागणी केली. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे युवकाने त्यांना सांगितले. कोकरे यांनी त्याला सव्वातीन लाख रुपये मागितले. युवकाने एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली. माकणीकर, अपर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण लाकडे, सचिन मत्ते, हेडकॉन्स्टेबल अस्मिता मेश्राम, विकास सायरे, सारंग बालपांडे, राजू जांभूळकर यांनी धरमपेठेतील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क परिसरात गुरुवारी रात्री सापळा रचला. कोकरे यांनी लाच घेताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सव्वातीन लाखाचे वाटेकरी किती?कोकरे यांनी एकट्यासाठी लाच घेतली की या सव्वातीन लाखांमध्ये आणखी वाटेकरी आहेत, याचा तपास एसीबीचे पथक करीत आहे. कोकरे यांनी त्यांची नावे सांगितल्यास या अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई होण्याची शक्यता एसीबीच्या सूत्राने वर्तवली. आठवड्यातील दुसरी कारवाईबीअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने चंद्रपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांना अटक केली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आठवडाभरात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.