T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 11, 2026

T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

T20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात झाल्यापासून टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के बसतायत. आधी ऑलराऊंडर हर्षित राणा दुखापतीमुळे आऊट झाला. आता टीम उद्या 12 फेब्रुवारीला नामीबिया विरुद्ध दुसरा टी 20 सामना खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. भारतीय संघाचा स्टार ओपनर अभिषेक शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिषेक शर्माच्या पोटात इंफेक्शन झालय. अभिषेक शर्माला रुग्णालयात दाखल करावं लागल्याने तो नामीबिया विरुद्ध खेळण्याची शक्यता मावळली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर 12 फेब्रुवारीला भारत विरुद्ध नामीबिया मॅच होणार आहे. टीम इंडियाचा USA विरुद्ध 7 फेब्रुवारीला टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच झाली. पहिल्या सामन्याच्यावेळीच अभिषेक शर्माची तब्येत बिघडल्याची चर्चा होती. अंगात ताप असूनही अभिषेक ही मॅच खेळला. त्यानंतर त्याची तब्येत आणखी बिघडली.

USA विरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा गोल्डन डक झाला होता. फलंदाजीनंतर तो टीम इंडियाच्या डग आऊट एरियामध्ये सुद्धा दिसला नाही. त्याच्या जागी 12 वा खेळाडू संजू सॅमसन फिल्डिंगसाठी मैदानात उतरलेला. अभिषेक शिवाय जसप्रीत बुमराह सुद्धा आजारी होता. वॉशिंग्टन सुंदर सुद्धा टीम सोबत नव्हता. USA विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ड्रिंक सर्व करण्याचं काम कुलदीप यादवसह फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी केलं होतं. अभिषेकची तब्येत त्यावेळी इतकी खराब होती की, त्या मॅच नंतर तो हँडशेक करण्यासाठी सुद्धा आला नाही.

असिस्टेंट कोच रेयान डेस काटे काय म्हणाले?

10 फेब्रुवारीला अभिषेक शर्मा टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सुद्धा दिसला नाही. त्याच्या अनुपस्थितीमागे टीम मॅनेजमेंटकडून त्याचं पोट बिघडल्याचं कारण देण्यात आलं होतं. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अभिषेकला इंफेक्शन झालय. “अभिषेकच्या पोटाची काहीतरी समस्या आहे. पुढच्या दोन दिवसात तो मैदानात उतरण्यासाठी उपलब्ध असेल अशी मला अपेक्षा आहे” असं प्रॅक्टिस सेशनआधी मीडियासोबत बोलताना टीम इंडियाचे असिस्टेंट कोच रेयान डेस काटे म्हणाले.

24 तासात त्याची तब्येत आणखी जास्त बिघडली

अभिषेक प्रॅक्टिस सेशनसाठी आला नाही. त्याचवेळी संजू सॅमसन फलंदाजीचा जोरदार सराव करत होता. त्यामुळे अभिषेक नामीबिया विरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. मागच्या 24 तासात त्याची तब्येत आणखी जास्त बिघडल्याची माहिती आहे. अभिषेक 8 फेब्रुवारीला टीम इंडियासोबत दिल्लीत गौतम गंभीरच्या निवासस्थानी डिनर पार्टीमध्ये दिसला होता. तिथे त्याच्या प्रकृतीबद्दल गंभीर थोडा चिंतेत दिसत होता. आज 11 फेब्रुवारीला प्री-मॅच कॉन्फरन्स होणार आहे. त्यात अभिषेकच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती मिळू शकते. अभिषेकला कधीपर्यंत ठणठणीत होईल या बद्दल अचूक माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.