Monsoon : यंदाच वरीस धोक्याचं… मान्सूनबाबत धोक्याची घंटा, थेट WMO कडून अलर्ट जारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 3, 2026

Monsoon : यंदाच वरीस धोक्याचं… मान्सूनबाबत धोक्याची घंटा, थेट WMO कडून अलर्ट जारी

Monsoon : यंदाच वरीस धोक्याचं… मान्सूनबाबत धोक्याची घंटा, थेट WMO कडून अलर्ट जारी

भारतात मान्सूनचे आगमन लांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच आता जागतिक हवामान संस्था (WMO) च्या अत्यंत एका अहवालामुळे जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांची चिंता वाढली आहे. WMO ने अधिकृतपणे सांगितले की प्रशांत महासागरात अल-नीनोची परिस्थिती वेगाने विकसित होत आहे. ज्यामुळे येत्या काही महिन्यांत जागतिक तापमान आणि पावसाच्या पद्धतीत मोठे बदल घडू शकतो. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये येणारा अल-नीनो हा सामान्य नसून मध्यम ते अत्यंत तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, भूमध्यरेषीय प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान असामान्यरीत्या वाढल्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. संयुक्त राष्टांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी एक व्हिडिओ जारी करत इशारा दिला आहे की, अल-नीनो आधीच तापलेल्या पृथ्वीवरील संकट अधिक तीव्र करेल. त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात आणि जागतिक अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था व शेतीवर मोठा परिणाम करू शकतात. यामुळे भारतीय कृषी क्षेत्रालाही फटका बसू शकतो.

अल-नीनो म्हणजे काय?

अल-नीनो ही नैसर्गिक हवामानाशी संबंधित घटना आहे. मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यरीत्या वाढल्यामुळे ती निर्माण होते. ही घटना एल-नीनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) चा भाग आहे. याच्या विरुद्ध थंड टप्प्याला ला-नीना म्हटले जाते. साधारणपणे अल-नीनो दर दोन ते सात वर्षांनी येतो आणि सुमारे 9 ते 12 महिने सक्रिय राहतो. मार्च ते जूनदरम्यान त्याची निर्मिती सुरू होते आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान तो सर्वाधिक प्रभावी ठरतो. वैज्ञानिकांच्या मते, त्याचा सर्वात धोकादायक परिणाम दुसऱ्या वर्षात दिसून येतो. यामुळे समुद्राखालील तापमान सरासरीपेक्षा तब्बल 6 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले आहे. ही प्रचंड उष्णता भविष्यात तीव्र दुष्काळ, प्रचंड उष्णतेच्या लाटा आणि विनाशकारी पुराचे कारण ठरू शकते.

जून ते ऑगस्ट 2026 धोक्याचा काळ

WMO च्या नव्या अपडेटनुसार जून ते ऑगस्ट 2026 दरम्यान अल-नीनो सक्रिय होण्याची 80 टक्के शक्यता आहे, तर नोव्हेंबरपर्यंत तो कायम राहण्याची शक्यता 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या काळात जगभरात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हीट स्ट्रेबस म्हणजेच उष्णतेमुळे होणारा शारीरिक ताण वाढू शकतो. अनेक भागांत तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

भारत आणि दक्षिण आशियावर काय परिणाम?

भारतीय उपखंड आणि दक्षिण आशियासाठी हा अहवाल चिंताजनक आहे. WMO ने स्पष्ट केले आहे की अल-नीनोच्या प्रभावामुळे यावर्षी दक्षिण आशियात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहू शकतो. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी मान्सून हा खूप महत्त्वाचा आहे. मात्र जर पाऊस कमी झाला तर शेती उत्पादन, पाण्याची उपलब्धता आणि अन्नसुरक्षेवर थेट परिणाम होईल. कमी पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडू शकते.