
जागतिक पातळीवरून मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या ओडेसा बंदरातून निघालेल्या एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी मालवाहू जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक भारतीय गंभीर जखमी झाला आहे. यानंतर आता भारत सरकारकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
परराष्ट्र मंत्रालयाने दिली हल्ल्याची माहिती
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी हा हल्ला झाला. त्यावेळी जहाजावर 17 कर्मचारी होते, त्यापैकी पाच भारतीय नागरिक होते. या हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू झाला, तर एक भारतीय गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या युक्रेनमधील भारतीय दूतावास संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, प्रभावित भारतीयांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
भारताकडून तीव्र निषेध
भारत सरकारने मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत जखमीच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना केली आहे. अधिकृत निवेदनात भारताने स्पष्ट केले की, व्यापारी जहाजांवर हल्ला करणे, निष्पाप नागरी कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणे आणि समुद्री वाहतूक तसेच जागतिक व्यापाराच्या स्वातंत्र्यात अडथळा निर्माण करणे पूर्णपणे अस्वीकार्य आणि निषेधार्ह आहे. भारताने अशा हल्ल्यांपासून दूर राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
रशियाने हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा
युक्रेनने या हल्ल्यासाठी रशियाला थेट जबाबदार धरले आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दावा केला की, रशियाने युक्रेनच्या समुद्री मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका नागरी मालवाहू जहाजावर पुन्हा हल्ला केला. या जहाजावर भारत आणि सिरियाचे नागरिक होते. या हल्ल्यात युक्रेनचा एक मरीन पायलट आणि चार भारतीय कर्मचारी ठार झाले आहेत. युक्रेन या प्रकरणी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) आणि आपल्या सहयोगी देशांसमोर हा मुद्दा मांडणार असून, रशियाविरोधात कठोर आंतरराष्ट्रीय कारवाई आणि नव्या निर्बंधांची मागणी करणार असल्याचेही युक्रेनने म्हटले आहे.