Ladki Bahin Yojana : जे हायकोर्टात गेले ते आज..लाडकी बहिण योजनेवरुन आदिती तटकरे यांनी कोणाला सुनावलं ? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 25, 2026

Ladki Bahin Yojana : जे हायकोर्टात गेले ते आज..लाडकी बहिण योजनेवरुन आदिती तटकरे यांनी कोणाला सुनावलं ?

Ladki Bahin Yojana : जे हायकोर्टात गेले ते आज..लाडकी बहिण योजनेवरुन आदिती तटकरे यांनी कोणाला सुनावलं ?

महायुतीची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना नेहमीच चर्चेत असते. कधी त्यावरून मिळणाऱ्या पैशांच्या मुद्यावरून, तर कधी त्यातीर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे तर कधी ई-केवायसीच्या मुद्यावरून. या योजनेतील फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले, अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचेही उघड झाल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी, ते रोखण्यासाठी पडताळणी करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांचं नाव त्यातून वगळण्यात आल्यावर कित्येकांना योजनेचा हप्ता, दर महिन्याला मिळणारे पैसे बंद झाले. मात्र त्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आणि ही योजना बंद होणार, लाडक्या बहिणींची गरज संपली आता ही योजना बंद होऊ शकते असं म्हणण्यास सुरूवात केली. मात्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात येत असून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तरहीदलं आहे. ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही, असं तटकरे यांनी सुनावलं.

काय म्हणाल्या अदिती तटकरे ?

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून जी टीका होते, ती मी गांभीर्याने घेत नाही. ही योजना आणूच नका, शासनाचे नुकसान होईल, या शब्दात विरोधकांनी लाडकी बहीण योजना सुरू करताना विरोध केला होता,
काही मंडळी तर उच्च न्यायालयातदेखील गेली होती. त्यामुळे ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली, त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही, असं अदिती तटकरेंनी सुनावलं. जेव्हा चांगलं काम आपण करत असतो, तेव्हा सरकारवर टीका ही होतच राहणार. विरोधक म्हटल्यावर टीका करणारच, असंही त्या म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात, हे एकच महायुतीचे धोरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या सर्वांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना कायम सुरूच ठेवणार आहोत, असंही अदिती तटकरेंनी स्प्षट केलं.

यंदा अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकऱ्यांसाठी धोरण आणले, आणि ते महिलांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. लखपती दीदी असेल किंवा इतर योजना अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. लाडके बहीण योजनेचा एकही हप्ता चुकलेला नाही जर एखाद्या महिन्याचा चुकलेला असेल तर पुढच्या महिन्यात दोन महिन्याचे पैसे मिळाले आहेत, असंही त्यांनी अदिती तटकरेंनी नमूद केलं.