
CJP Tiranga March Abhijeet Dipke: काँग्रेसनंतर आता दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी आंदोलकाच्या भूमिकेत आहे. गेल्या आठवडाभरापसून 10 ऑक्टोबरपासून आंदोलनाची हाक देऊनही पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांमुळे त्यांना मोठे यश आलेले नाही. विविध कलम आणि नियमांवर बोट दाखवत आंदोलन हाणून पाडण्याचा जोरकस प्रयत्न सुरू आहे. त्यातच दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात लहरा दो तिरंगा मार्चपूर्वीच पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आणि आंदोलनाची हवा काढली. दिपके यांची 24 तासात सशर्त जामीनावर सुटका झाली. तुरूंगातून बाहेर पडताच दिपके यांनी समाज माध्यम प्लॅटफॉर्म X वर एका ओळीची पोस्ट लिहिली. त्यात बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा फोटो शेअर करत त्याने एक गमंतीशीर पोस्ट केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे दिपकेंची पोस्ट?
काल दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट केली. पठाण चित्रपटातील शाहरूख खानचा लूक असलेला एक फोटो त्याने शेअर केला. “24 तास कोणतेही वायफाय आणि फोनशिवाय तुरूंगातून बाहेर पडताना नेमके कसे वाटते…” अशा आशयाची ही पोस्ट आहे. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जेन झीचा उद्वेग त्यातून त्यांनी मांडला आहे. मूलभूत अधिकारांसोबत आता इंटरनेटही किती महत्त्वाचे हे त्यांनी अधोरेखित केले आहे.
दिल्लीत काय घडलं?
शुक्रवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात सीजेपीने लहरा दो तिरंगा या आंदोलनाची हाक दिली होती. पोलिसांनी त्यापूर्वीच मार्चला परवानगी नाकारली आणि प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या. तरीही आंदोलन करण्याची भूमिका दिपके यांनी जाहीर केली. त्यानंतर पोलिसांनी करोल बाग येथील निवासस्थानातून अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना ताब्यात घेतले होते.
How it feels walking out of jail after 24 hours with no wifi and phone https://t.co/QrnvYmiMJc
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 17, 2026
सशर्त जामीन मंजूर
सीजेपीने अगोदर दिपके यांना कुठे ठेवले हे माहिती नसून पोलिसांनी त्यांना गुप्त ठिकाणी ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दिपके यांना अटक केल्याची बातमी धडकली. शनिवारी पोलिसांनी त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. सुनावणीअंती न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. एका वर्षांच्या शांतता ठेवण्याच्या हमीवर त्यांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे जंतरमंतर परिसरात आंदोलन केल्याचा ठपका ठेवत यापूर्वी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांच्या कोठडीत तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. तर 24 तासात अभिजीत दिपके हे बाहेर आले आहेत. या सर्व कारवाईवरून सीजेपीने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.