नवी दिल्लीः भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सने यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. या यादीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सर्वात श्रीमंत टॉप ५ च्या यादीत ४ गुजराती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ अब्ज डॉलर (३.५ लाख कोटी रुपये) आहे. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५.७ अब्ज डॉलर (१.१० लाख कोटी) रुपये इतकी आहे. या यादीतील चार गुजराती असलेल्या उद्योगपतींची एकूण संपत्ती ७ लाख कोटी रुपये इतकी आहे. फोर्ब्सने नुकतीच भारतातील सर्वात श्रीमंत १०० जणांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत टॉप ५ मध्ये पहिले चार जण हे गुजराती आहेत. या चार जणांची एकूण संपत्ती ९६.९ अब्ज डॉलर (७ लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानी यांचे वडील गुजरातमधील चोरवाडचे रहिवासी होते. त्यांनी रिफायनरी ते टेलिकॉमचा व्यवसाय सांभाळला. मुकेश अंबानी यांनी जिओच्या माध्यमातून मोबाइल क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांच्या संपत्तीत २८ हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जिओचे देशभरात ३४ कोटी ग्राहक आहेत. अहमदाबाद हून आपला व्यापार सुरू करणाऱ्या गौतम अदानी यांनी पहिल्यांदा या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. एअरपोर्ट व डेटा सेंटर्स या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. गुजरातचे रहिवासी शापूरजी ग्रुपचे पालोनजी मिस्त्री यांची एकूण संपत्ती १५ अब्ज डॉलर (१.०५ लाख कोटी) आहे. मिस्त्री हे २००३ पासून आयर्लंडला स्थायिक झाले आहेत. परंतु, ते मूळचे गुजरातमधील आहेत. त्यांची सर्वाधिक गुंतवणूक टाटा सन्समध्ये आहे. गुजरातच्या लोहाना समाजाचे असलेल्या उदय कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १४.८ अब्ज डॉलर (१.०२ लाख कोटी) इतकी आहे. कापसापासून बँकिंग पर्यंत व्यापार करणाऱ्या कोटक यांनी १९८० साली एक फायनान्सशियल पासून सुरुवात केली होती. ती आज कोटक महिंद्रा बँक म्हणून ओळखली जाते. फोर्ब्सच्या या यादीत सहा नवीन चेहऱ्यांचा समावेश पाहायला मिळतो. एडटेक कंपनी बैजूचे संस्थापक बैजू रवींद्रण, हल्दीराम स्नॅक्सचे मनोहर लाल तथा मधुसूदन अग्रवाल, बाथरूम फिटिंग्सचे जॅग्युआर ब्रँडचे मालक राजेश मेहरा यांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या यादीतील 'टॉप १०' १) मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी) २) गौतम अदानी - एकूण संपत्ती (१.१० लाख कोटी) ३) हिंदुजा ब्रदर्स - एकूण संपत्ती (१.०९ लाख कोटी) ४) पालोनजी मिस्त्री - एकूण संपत्ती (१.०५ लाख कोटी) ५) उदय कोटक - एकूण संपत्ती (१.०२ लाख कोटी) ६) शिव नादर - एकूण संपत्ती (१.००८ लाख कोटी) ७) राधाकृष्ण दमानी - एकूण संपत्ती (१.००१ लाख कोटी) ८) गोदरेज फॅमिली - एकूण संपत्ती (८४००० कोटी) ९) लक्ष्मी मित्तल - एकूण संपत्ती (७३५०० कोटी) १०) कुमारमंगलम बिरला - एकूण संपत्ती (६७२०० कोटी)