
मुंबईः सुमारे वर्षभर कर्करोगाशी यशस्वी लढा दिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मागच्याच महिन्यात न्यूयॉर्कहून भारतात परतले आहेत. मायदेशी परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी खास फोटोशूट केलं आहे. अविनाश गोवारीकर यांनी हे शूट केले आहे. 'छोट्याशा विश्रांतीनंतर ते पुन्हा सज्ज झाले आहेत. चिंटुजी ना पुन्हा एकदा कॅमेरातून पाहण्याचा आनंद मी शब्दात नाही मांडू शकत.' असं कॅप्शन अविनाश गोवारीकर यांनी या फोटोसोबत दिलं आहे. यानंतर ऋषी कपूर यांनीही ट्विटरवर तोच फोटो पोस्ट करत अविनाश गोवारीकर यांचे आभार मानले आहेत. न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांच्यावर वर्षभर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच्या काळात ऋषी कपूर यांची पत्नी नीत कपूर याही त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्येच होत्या. न्यूयॉर्कमध्ये असतानाही ऋषी कपूर सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात होते. रणबीर आणि आलियादेखील अधून मधून ऋषी कपूर यांना भेटायला जात. अभिनेते अनुपम खेर यांची तर ऋषी कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये अनेकदा भेट झाली आहे. ऋषी कपूर यांचा लवकरच 'झुठा कही का' हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमानंतर आणखी तीन सिनेमांसाठी त्यांनी होकार दिला आहे. न्यूयॉर्कमध्येच त्यांनी आगामी तीन सिनेमे साइन केले होते.