नवी दिल्ली: दोन दिवसांच्या नियोजित दौऱ्यासाठी पंतप्रधान सोमवारी मध्यरात्री सौदी अरबमध्ये दाखल झाले आहेत. सौदींचे किंग सलमान बिन अब्दुलअजीज अल सैद यांच्या खास आमंत्रणावरून मोदी या दौऱ्यावर गेले असून पश्चिम आशियाई देशांसाठी मोदींचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. रियाध येथील किंग खालिद इंटरनॅशनल एअरपोर्टवर मोदींचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आलं. मोदी हे सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार असून दोन्ही देशांमध्ये तेल, वायू, ऊर्जा आणि नागरी उड्डाणासह विविध क्षेत्रांतील जवळपास डझनभर करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली. मोदी आपल्या दौऱ्यात रूपे कार्ड देखील लाँच करणार आहेत. त्याचबरोबर फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह (FII) च्या तिसऱ्या सत्रात ते सहभागी होणार आहेत. याआधी २०१६ साली मोदींनी सौदीचा दौरा केला होता.