वॉशिंग्टन: अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करत सुटलेल्या 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेनं मोठी कारवाई केली असल्याचं वृत्त आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'आताच काहीतरी मोठं घडलंय' असं ट्विट केल्यानं सगळ्या जगाचं लक्ष ते काय घोषणा करणार आहेत याकडे लागलं आहे. अमेरिकेनं आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे, असं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. त्यात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'काही तरी मोठं घडलंय' असं ट्विट केल्यानं बगदादी मारला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप ठोस माहिती समोर येऊ शकलेली नाही.