करार मोडल्यानं बांगलादेशचा कर्णधार शकीब गोत्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2019

करार मोडल्यानं बांगलादेशचा कर्णधार शकीब गोत्यात

https://ift.tt/2NjaOrw
वृत्तसंस्था, ढाका कर्णधार शकीब अल हसनने देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मागण्यासाठी जोरदार लढा दिला आणि त्याचा त्यांना फायदाही होईल. मात्र, स्वत: शकीब हा बांगलादेश क्रिकेट बोर्डच्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अडचणीत आला आहे. या आंदोलनाचा वचपा बोर्ड त्याच्यावर या निमित्ताने काढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केंद्रिय कराराचा भंग केल्याप्रकरणी भारत दौऱ्यापूर्वी त्याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करू शकते. शकीबने ‘ग्रामीणफोन’ या दूरसंचार कंपनीसोबत करार केला. ज्यामुळे बोर्डाच्या कराराचा भंग झाला आहे. एका वेबसाइटशी बोलताना बांगलादेश बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन म्हणाले, की शकीबकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शकीब हा या दूरसंचार कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे. २२ ऑक्टोबरला याची घोषणा करण्यात आली. हसन म्हणाले, ‘तो दूरसंचार कंपनीसोबत असा करार करूच शकत नाही. कारण, आमच्या करारात तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ‘रॉबी’ ही दूरसंचार कंपनी आमची मुख्य प्रायोजक आहे. ‘ग्रामीणफोन’ने त्या वेळी बोलीच लावली नव्हती. या उलट या कंपनीने काही क्रिकेटपटूंसोबत करार केले. याचा परिणाम म्हणजे बोर्डाला तीन वर्षांत ९० कोटी टकाचा फटका बसला आहे. म्हणूनच आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहोत. या संदर्भात आम्ही कोणालाही वाचवू शकत नाही. यासाठी आम्ही भरपाईची मागणी करणार आहोत. ही भरपाई आम्ही त्या कंपनी आणि खेळाडूंकडूनही करणार आहोत.’ बोर्डाने याबाबत शकीबकडून खुलासा मागवला आहे. भारत-बांगलादेशदरम्यान तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे बांगलादेश संघाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. मात्र, भारत दौऱ्यापूर्वी बांगलादेशने मुशफिकूर रहीम आणि महमुदुल्ला रियाध या अनुभवी खेळाडूंना साथीला घेत बोर्डाविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतला होता. या संपात त्यांच्यासह ५० स्थानिक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या मानधनासह अकरा मागण्या ठेवल्या होत्या. बोर्डाने या मागण्या मान्य केल्याने हा संप मागे घेण्यात आला होता. त्यामुळे प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आता ३५ हजारांऐवजी ७० हजार रुपये मानधन मिळण्याची शक्यता आहे.