
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'बाहुबली' अर्थात अभिनेता याचे चाहते जगभर आहेत. प्रभाससोबत काम करण्याची अनेक बड्या दिग्दर्शकांची इच्छा आहे. पण प्रभासला मात्र बॉलिवूडमधल्या एका दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करायचे आहे. बॉलिवूडमधील या दिग्दर्शकाचा आणि त्याच्या चित्रपटांचा प्रभास जबरा फॅन आहे. त्या दिग्दर्शकाचे नाव आहे राजकुमार हिरानी... प्रभासचे फॅन्स त्याचा प्रत्येक चित्रपट 'फर्स्ट डे...फर्स्ट शो' पाहायला जातात आणि थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्यानंतरही या लाडक्या अभिनेत्याचे चित्रपट त्याच्या फॅन्सनी पुन्हा पुन्हा पाहिले असतील याबद्दल दुमत नाहीच. प्रभासचेही असेच काहीसे आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेले 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' आणि 'थ्री इडियट्स' हे चित्रपट प्रभासने तब्बल २० - २० वेळा पाहिले आहेत असा खुलासा एका मुलाखतीदरम्यान खुद्द प्रभासनेच केला होता. बॉलिवूडमध्ये तुझा आवडता दिग्दर्शक कोण आहे? असा प्रश्न प्रभासला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला त्यावेळी प्रभासनं राजकुमार हिरानींचे नाव घेतलं होते. 'बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम दिग्दर्शक आहेत पण मी मात्र राजकुमार हिरानींचा फॅन आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' आणि 'थ्री इडियट्स' हे दोन्ही चित्रपट मी किमान वीस वेळा तरी पाहिले असतील. माझे ते फार आवडीचे दिग्दर्शक असले तरी त्यांचा 'पी.के' मात्र मला फारसा आवडला नाही ' असंही प्रभास म्हणाला होता. दरम्यान, प्रभास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' हा चरित्रपट काही महिन्यांपूर्वीच आला होता. अभिनेता विवेक ओबेरॉयनं यामध्ये मोदींची भूमिका साकारली होती. बॉलिवूडचे नामवंत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेदेखील मोदींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करण्याच्या बेतात आहेत. या सिनेमात 'बाहुबली'फेम अभिनेता नमोंच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. प्रभासच्या या वेगळ्या भूमिकेबद्दल चाहत्यांना चक्कीच उत्सुकता असेल.