'आरे बचाव' आंदोलन पेटले; पत्रकारही ताब्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 5, 2019

'आरे बचाव' आंदोलन पेटले; पत्रकारही ताब्यात

https://ift.tt/30OwCQP
व मुंबई: वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवत असलेल्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे प्रतिनिधी श्रीकांत भोसले आरे कॉलनी येथून तेथील तणावाच्या परिस्थितीबाबतचे वृत्तांकन फेसबुक लाइव्हवरून करत होते. त्यावेळी पोलिसांनी श्रीकांत भोसले यांना ताब्यात घेऊन नंतर पोलीस स्थानकात आणून सुटका केली. त्यांच्यासह अन्य प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना तसेच मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई 'मेट्रो ३'चे कारशेड आरे कॉलनीत बनविण्याच्या व त्यासाठी तेथील हजारो झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. तसंच, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं तिथं दाद मागा, असं न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितलं. न्यायालयाचा हा निकाल येताच मेट्रो प्रशासनानं शुक्रवारी रात्रीपासूनच 'आरे'तील झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा यास तीव्र विरोध होत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल लागताच संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे कापायला सुरुवातही झाली. रात्रीच्या अंधारात झाडं कपण्याचा हा प्रकार फार काळ लपू शकला नाही. पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेच्या आंदोलकांना याचा सुगावा लागला. आणि शेकडोंच्या संख्येने त्यांनी आरेत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून गोरेगाव हायवेपासूनच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. लोकांना आरे परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने जमले होते. वातावरण तणावग्रस्त होते. या पर्यावरणवाद्यांची वृक्षतोडीबाबतची कळकळ माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे लोकांसमोर नेत होते. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांसह प्रतिनिधींनाही अटकाव करत ताब्यात घेतले.