
मुंबईः भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी एका छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अजिंक्य आणि राधिकाला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं ट्विटरवर ही गुडन्यूज दिली आहे. हरभजनच्या या ट्विटनंतर अजिंक्य आणि राधिकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी अजिंक्यनं लवकरच तो बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. राधिकाचे डोहाळे जेवणाचे फोटोही त्यानं शेअर केले होते. त्यांच्या या फोटोवर भरपूर लाइक्स आणि कमेंट आले होते. अजिंक्य आणि राधिका २६ नोव्हेंबर २०१४मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघेही बालपणीचे मित्र असून कॉलेजमध्ये असताना त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.