उंदराच्या विषाने घासले दात, महिलेचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 26, 2019

उंदराच्या विषाने घासले दात, महिलेचा मृत्यू

https://ift.tt/2OGQ4uG
उडुपी (कर्नाटक): टूथपेस्टच्या जागी अनवधानाने उंदीर मारण्याच्या विषाने दात घासल्याने एक महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात ही आश्चर्यकारक घटना घडली. उडुपीमधील मालपे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लीला करकेला (५७) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे उडुपी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना १९ नोव्हेंबर या दिवशी घडली. लीला करकेला या १९ नोव्हेंबर या दिवशी भल्या पहाटे ५ वाजता उठल्या. उठल्याबरोबर त्या दात घासण्यासाठी गेल्या. मात्र, लीला यांची झोप काहीशी अपूर्ण राहिलेली होती. त्यांच्या डोळ्यावर झोप असल्याने टूथपेस्ट आणि उंदीर मारण्याचे विष या दोन्हीमध्ये त्या फरक करू शकल्या नाहीत. त्यांनी उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची तब्येत बिघडली. लीला यांना काहीतरी होते आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी लीला यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये लीला यांच्यावर ५ दिवस उपचार सुरू होते. मात्र, उंदीर मारण्याच्या औषधाचे विष त्यांच्या संपूर्ण शरीरात भिनलेले होते. याच कारणामुळे डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत असे सांगितले जात आहे. रविवारी लिला करकेला यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.