सिनेरिव्ह्यू: पडद्यावर फसलेली 'कॉपी' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 8, 2019

सिनेरिव्ह्यू: पडद्यावर फसलेली 'कॉपी'

https://ift.tt/2NSENqV
कल्पेशराज कुबल काही अपवाद वगळल्यास ग्रामीण भागातील सरकारी आणि संस्थांच्या शाळांची गुणवत्ता किंबहुना अवस्था तितकीशी समाधानकारक नाही, हे आपण जाणतो. सरकारचे अनुदान घेऊन शाळा चालवण्याचे ढोंग करणारे तथाकथित शिक्षणसम्राट गरजू विद्यार्थी आणि प्रामाणिक शिक्षकांच्या जीवावर श्रीमंत होत आहेत. या आणि अशा वार्ता ग्रामीण भागातून आजही कानावर पडत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या असल्या तरी त्या शिक्षणाचा दर्जा गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत विद्यार्थ्यांना केवळ ढकलले जाते. शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या या आणि याच्या संलग्न असलेल्या गैरप्रकारांवर '' हा सिनेमा भाष्य करतो. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या लेखक-दिग्दर्शकाच्या जोडीला 'कॉपी' सिनेमातून एक मार्मिक गोष्ट पडद्यावर मांडायची आहे. पण, त्या गोष्टीची रंजक बांधणी मात्र दिग्दर्शकाला करता आलेली नाही. सिनेमाच्या कथानायकांच्या तोंडी असलेली अलंकारिक वाक्ये खटकतात. शाब्दिकदृष्ट्या सिनेमांचे संवाद जरी उत्तम असले तरी कथानकाच्या पार्श्वभूमीला ते साजेसे वाटत नाहीत. मुद्दाम 'टाळी वाक्य' व्यक्तिरेखांच्या तोंडी पेरल्याचे जाणवते. सिनेमाचा विषय सर्वव्यापी आहे. शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असलं तरी शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण्याची खरी इच्छा आहे ते या शिक्षण व्यवस्थेच्या दिव्यात अडकले आहेत तर दुसरीकडे शाळेत प्रामाणिक ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षकही या चक्रव्यूहात अडकले आहेत. या सगळ्याचा एक सार 'कॉपी'मध्ये केवळ कथानकाच्या पातळीवर दडला आहे. ही गोष्ट आहे शिवा (प्रतीक लाड), प्रकाश (अज्ञेश मदूशिंगरकर), प्रिया (श्रद्धा सावंत) या तीन मित्रांची. खेड्यातील अत्यंत गरीब कुटुंबातील या मुलांना शिकायचे आहे. खेड्यातील स्वतःच्या घरातून कित्येक मैल दूर चालत, डोंगर-नदी ओलांडून ते शाळेत जात आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वीटभट्टीत काम करून रोजगार मिळवणाऱ्या या कुटुंबातील मुलांना शिक्षण घेऊन 'साहेब' व्हायचे आहे. शाळेत इतर सर्व विद्यार्थी परीक्षेला कॉपी करून उत्तीर्ण होत आहेत. तशी मुभाच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली आहे. पण, शिवा, प्रकाश आणि प्रिया मात्र प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देत आहेत. शिक्षणासाठीचा त्यांचा संघर्ष त्यांना वीटभट्टीत काम करायला भागही पाडतो. अशा परिस्थितीत एकीकडे विद्यार्थी परीक्षेत कॉपी करून उत्तीर्ण होत आहे आणि दुसरीकडे शाळेतील अनेक शिक्षक शाळेच्या वेळेत खासगी ट्युशनमध्ये शिकवणी घेत आहेत. ही अशी अनागोंदी परिस्थिती सुरु असताना शासनाचा शिक्षण अधिकारी शाळेची पहाणी करून शाळेला कुलूप ठोकतो. सिनेमाच्या या वळणावर कथानकाचे मूळ नाट्य सुरु होते. हे नाट्य सिनेमातच बघण्याजोगे आहे. शाळेतील शिक्षणाचे काय होते? विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय? शाळा पुन्हा सुरु होते का? ही सगळी उत्तरे तुम्हाला सिनेमात मिळतील. शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे आणि शिक्षण अधिकारी असलेल्या कमलेश सावंत यांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत. सिनेमाची दिग्दर्शकीय मांडणी काहीशी ढिसाळ झाली असली तरी सिनेमाचा मूळ विषय आणि त्याची दाहकता प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचते. कथानकातील प्रसंगांचे बारकावे दिग्दर्शकाने उत्तम मांडले आहेत. विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांच्या अभिनयात कृत्रिमता निदर्शनास येते. पटकथा आणि संकलनाच्या बाबीत अधिक काम करण्यास वाव होता.