
मुंबई मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. वांद्रे, खार, सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर सायन, वडाळा परिसरातही पावसाने जोर धरला आहे. मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र, पावसाने विश्रांती न घेतल्यास मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याआधी अरबी समुद्रात 'महा' नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती दिली होती. मात्र, या वादळाचा मुंबईच्या किनारपट्टीला धोका नसल्याचेही सांगण्यात आले होते. वादळाची तीव्रता वाढल्याने पालघर, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता.