मुंबई: भारताचा उदयोन्मुख खेळाडू यानं आठ महिन्यांच्या बंदीनंतर दमदार वापसी केली आहे. त्यानं रविवारी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईकडून खेळताना आसामविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्यानं अवघ्या ३२ चेंडूंतच अर्धशतक ठोकलं. सलामीला आलेल्या पृथ्वीनं चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३९ चेंडूंमध्ये ६३ धावा कुटल्या. तडाखेबंद अर्धशतकी केल्यानंतर पृथ्वी शॉ यानं बॅट उंचावून जल्लोष केला. त्याचवेळी त्यानं बॅटकडे इशारा करून यापुढे बॅटनंच उत्तर देईल, असे संकेत दिले. त्याला अलीकडेच मुंबईच्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आलं होतं. या युवा फलंदाजावर बीसीसीआयनं मुश्ताक अली करंडक स्पर्धेदरम्यान डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानंतर आठ महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत तो क्रिकेटपासून दूर होता. मुंबईने गुरुवारी दोन सामने आणि सुपर लीग फेरीसाठी संघाची घोषणा केली होती. हा मुंबईचा अखेरचा सामना आहे. याआधी पृथ्वी शॉ यानं नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पृथ्वी शॉ आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २३ ऑक्टोबर २०१८ रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला होता. हैदराबादमध्ये हा सामना झाला होता. आतापर्यंत तो भारताकडून दोन कसोटी सामने खेळला आहे. त्यात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.