मुंबई: महाराष्ट्रात आज नव्या सरकारचा शपथविधी होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही भिन्न विचारधारांचे हे सरकार एकत्र कसे काम करणार अशी टीका हे सरकार स्थापन होण्यापूर्वीच विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या दै. सामनाच्या अग्रलेखात आज कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार महाराष्ट्र धर्माचे पालन करील, असे राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सरकार हे तीन पायांचे आहे व ते टिकणार नाही,' असा शाप देवेंद्र फडणवीस यांनी शुभमुहूर्तावरच दिला आहे. पण हा त्यांचा भ्रम आहे. हे सरकार राष्ट्रीय प्रश्नांवर नाही, तर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर स्थापन झाले आहे व राज्याचा विकास करण्याबाबत तिन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, असे राऊत लिहीतात. पवार हे खंदे मार्गदर्शक 'शरद पवार यांच्यासारखा अनुभवी खंदा मार्गदर्शक पाठीशी आहे. तीनही बाजूला प्रशासनाची चांगलीच जाण असलेल्या माणसांची फौज आहे. मुख्य म्हणजे कुणाच्याही मनात एकमेकांविषयी जळमटे नाहीत,' असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. 'असे' आहेत नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैशिष्ट्य असे की, बाहेर वादळ असले की ते शांत राहतात व शांतता झाली की वादळ निर्माण करतात. देशातील भलेभले पुढारी दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकत आहेत असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी कोणताही दबाव जुमानला नाही. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या तडजोडी केल्या नाहीत व ज्यांनी बाळासाहेबांच्या साक्षीने ‘खोटे’ बोलण्याचा प्रयत्न केला त्या ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, अशा शब्दात राऊत यांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली आहे. रिकाम्या हातांना काम आणि महाराष्ट्राला स्वाभिमान खेड्यापाड्यातील बांधावर राहणारा, शेतावर राबणारा माणूस डोळय़ासमोर ठेवून प्रत्येकाला काम करावे लागेल. शेतकऱ्यास त्याची चूल पेटवता यावी, मुलाबाळांचे शिक्षण करता यावे इतके उत्पन्न तरी मिळावे. कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरलेला बळीराजाचा श्वास मोकळा कसा करता येईल यादृष्टीने काम करणे गरजेचे आहे. पोटभर अन्न, अंगभर कपडा व कोणत्याही बाबतीत लाचारी न जाणवण्याइतकी सुस्थिती खेड्यापाड्यात व झोपड्या-झोपड्यांत नांदली पाहिजे. त्याचबरोबर बौद्धिक लाचारी न वाटण्याइतकी शैक्षणिक पातळी असली पाहिजे. शेतकरी हा बळीराजा आहे असा साक्षात्कार प्रत्येकाला झाला पाहिजे, या दृष्टीने या सरकारने काम करावे अशी अपेक्षा या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. मराठी माणूस आळशी नाही व तो फाजील अपेक्षाही ठेवत नाही. मात्र त्याला खोटेपणाची आणि ढोंगाची चीड आहे. त्याच चिडीतून आजचे सरकार अभिमानाची ज्वाळा उसळावी तसे जन्माला आले आहे. महाराष्ट्र धर्म हा व्यापक आहे. त्याच महाराष्ट्र धर्मातून शिवरायांचे स्वराज्य अवतरले. ते स्वराज्य सगळय़ांचे होते. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.