मुंबई: नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आज तिसऱ्या दिवशी मुंबईत शिवेसनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विक्रोळी परिसर हा शिवसेनेचा गड मानला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरले आहे. चंद्रशेखर जाधव हे आज पहाटे त्यांच्या मुलांसोबत टागोरनगर परिसरातील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आपल्या कारमधून परतत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यानं तीन राउंड फायर केले. या गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागली. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या जाधव यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेचे वृत्त मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी हल्लेखोराला पकडले विक्रोळी हा शिवसेनेचा गड मानला जातो. मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांची मोठी वस्ती असलेल्या या भागात शिवसैनिकांची मोठी संख्या आहे. परिसरात गोळीबार झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. अनेक दिवसांपासून येत होत्या धमक्या दरम्यान, उपविभागप्रमुख शेखर जाधव यांना काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.