महाराष्ट्राचे सुपुत्र नरवणे आज लष्करप्रमुखपदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 31, 2019

महाराष्ट्राचे सुपुत्र नरवणे आज लष्करप्रमुखपदी

https://ift.tt/2MHC5Vg
नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार सांभाळणार आहेत. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी आज विराजमान होणार आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत हे आज ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) म्हणून विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केंद्र सरकारकडून करण्यात आली. नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण 'ज्ञानप्रबोधिनी'त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० '७ सीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. नरवणे यांचे वडील मुकुंद हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. मनोज यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.