
नागपूर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनात पक्षाचा विस्तार झाला, यात दूमत नाही. त्यामुळे पक्ष त्यांची नाराजी दूर करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकनाथ खडसेंनी राज्यातील भाजप नेत्यांविरोधातील नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. राज्यातील सत्ता गमावण्याची जबाबदारी राज्याच्या नेतृत्त्वाने घ्यायला हवी, असं रोखठोक मत खडसे यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरु असताना नागपूरात खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. याबद्दल मुनगंटीवार यांना विचारण्यात आले असता खडसे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 'खडसे नाराज आहेत हे काही लपून राहिलेलं नाही. त्यांची नाराजी दूर करण्याचं काम पक्ष नक्की करेल. खडसेंनी गेली ४० वर्ष पक्षाच्या वाढीचं काम केलं यात कोणाचंही दूमत नाही. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्त्वात काम केलंय. त्यामुळे त्यांची नाराजी दूर केली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे', असं मुनगंटीवार म्हणाले. नागपूरच्या प्रथम नागरिकावर गोळीबार हे दुर्देवी नागपूरच्या महापौरांवर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'राज्याच्या गृह विभागासाठी एकमेकांशी भांडणं सुरू आहेत, स्वतंत्र मंत्री नाही. त्यात नागपूरात अधिवेशन सुरू असताना नागपूरच्याच प्रथम नागरिकावर गोळीबार होतो हे सरकारचं अपयश आहे', असं मुनगंटीवार म्हणाले.