आमच्या घरात कांदे जास्त खात नाहीत, चिंता नाही: सीतारामन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 5, 2019

आमच्या घरात कांदे जास्त खात नाहीत, चिंता नाही: सीतारामन

https://ift.tt/2rYczDy
नवी दिल्ली: 'मी कांदा आणि लसूण फार खात नाही. मी अशा कुटुंबातून आलेय, जिथं कांद्याला फार महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळं काळजीचं कारण नाही...' हे उद्गार आहेत देशाच्या अर्थमंत्री यांचे. कांद्याच्या महागाईवरून देशभरात वातावरण तापलं असताना सीतारामन यांनी बुधवारी संसदेत हे वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्र्यांना बुडीत कर्जे आणि कांद्याच्या घटलेल्या उत्पादनामुळं शेतकऱ्यांपुढं उभ्या राहिलेल्या समस्येबद्दल प्रश्न विचारला होता. 'कांद्याच्या उत्पादनात कशामुळं घट झालीय? आपण दूध, तांदूळ व अन्य अनेक उत्पादन निर्यात करतो. मग कांद्याची ही अवस्था का आहे? कांदा उत्पादक हे छोटे शेतकरी असतात. सरकारनं त्यांचं संरक्षण केलं पाहिजे,' असं सुळे म्हणाल्या. सीतारामन यांनी त्यावर उत्तर देताना कांदे खाण्याविषयीच्या स्वत:च्या सवयींबद्दल सांगितलं. 'माझ्या कुटुंबात कांदा व लसणेचा वापर फार केला जात नाही. त्यामुळं कांद्याच्या महागाईचा आमच्यावर फार परिणाम झालेला नाही,' असं त्या म्हणाल्या. 'कांद्याचे भाव नियंत्रणात राहावेत म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून साठवण क्षमता वाढविण्याचा व सुधारण्याचा प्रयत्नही सुरू आहे,' असं त्यांनी सांगितलं. 'कांद्याच्या भावातील चढ-उताराचा अभ्यास करणाऱ्या मंत्रिगटाची मी २०१४ पासून सदस्य आहे. जेव्हा अतिरिक्त उत्पादन होतं, तेव्हा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका राहिली आहे. निर्यातदरांना ५ ते ७ टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय आम्ही एका रात्रीत घेतला आहे,' हेही त्यांनी निदर्शनास आणलं.