नवी मुंबईत दगडखाण घोटाळा? राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा राष्ट्रवादी पक्षाकडून आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 27, 2023

नवी मुंबईत दगडखाण घोटाळा? राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा राष्ट्रवादी पक्षाकडून आरोप

https://ift.tt/fKb3HcM
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळबाधित क्षेत्रातील खनिजकर्म शुल्कात सवलत दिल्याने, तिथल्या टेकडी, डोंगर सपाट करून काढण्यात आलेला दगड आणि आता अस्तित्वात असलेल्या दगडखाणींतील दगड, क्रशरच्या खडीतून मोठा आर्थिक फायदा लाटण्याचा कट आखला जात आहे. यामध्ये राज्यातील बड्या राजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्यामुळे यामध्ये सुमारे २ ते ३ कोटी रुपयांचा दगडखाण घोटाळा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतिलाल कडू आणि २७ गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.दगडखाण आणि क्रेशर मालकांना २५ लाखांचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत व्यवसायाची बांधिलकी ठेवण्याविषयी अन्यायकारक करार केला गेला आहे. त्यामुळे ८० टक्के दगडखाणी या एकाच कंपनीच्या अखत्यारित आल्या आहेत. भविष्यात स्थानिक, प्रकल्पग्रस्तांच्या व्यवसायांचे मालकी हक्कसुद्धा हिरावून घेण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. शिवाय दगड, खडीचे दर वाढण्याचा धोका आहे. सध्या खडीच्या दरात दुप्पट वाढ झाली असून त्यामुळे बांधकाम खर्च वाढला आहे. नवी मुंबई, मुंबईमधील बांधकामांना त्याचा फटका बसत आहे. येथील घरांच्या किमती दुप्पट, तिप्पट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यवसायातील एकाधिकारशाहीने नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील बांधकाम व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे हे थांबवण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळाच्या दगड उत्खननाविषयी झालेल्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे, अशी माहितीही प्रशांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. राज्याच्या महसूल खात्याने कायद्याचा बडगा उगारून काही क्रशर सुरू ठेवून इतरांवर बंदीची कारवाई केली आहे. या प्रकाराविरोधात हजारो शेतकरी, वाहतूकदार, दगडखाण मालक, क्रशरचालकांच्या सहभागाने लवकरच आंदोलनाचे आयोजन केले जाईल. रस्ता रोको, जेल भरो आंदोलन करून, यावेळी करो या मरोच्या भूमिकेतून ही लढाई लढली जाईल. याचे नियोजन सुरू आहे, अशी माहिती २७ गाव प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष नंदकुमार मुंगाजी यांनी यावेळी दिली.