मुंबई : इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत. या हल्ल्याचे पडसाद बुधवारी सकाळी आशियातील शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने बाजार उघडताच ३५० अंकांची डुबकी घेतली. सध्या तो १८० अंकांच्या घसरणीसह ४०६९० अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६० अंकांची घसरण झाली असून तो ११९९२ अंकांवर आहे. मंगळवारी शेअर निर्देशांक सावरले होते. आजच्या सत्रात बँकिंग शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यात पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक, ऍक्सिस बँक, आयडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे शेअर घसरले. यामुळे बेंचमार्क निर्देशांकाला झळ बसली. आज कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येस बँकेच्या शेअरमध्ये मात्र तेजी दिसून आली. बँकेकडून निधी उभारणीसाठी पर्यायांची चाचपणी केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी येस बँकेच्या शेअरची खरेदी केली. त्याचबरोबर व्होडाफोन आयडिया, भरती इन्फ्राटेल, टीसीएस हे शेअर सध्या तेजीत आहेत. आशियातील जपान, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील बाजारांमध्ये घसरण झाली. खनिज तेल महागले इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यानंतर इराण विरुद्ध अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे खनिज तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. खनिज तेलाचा भाव ७० डॉलरवर गेला. खनिज तेल २.७ टक्क्यांनी वधारून ७०.१० डॉलर प्रति बॅरल गेले आहे. एप्रिलनंतरचा खनिज तेलाचा हा सर्वाधिक दर आहे.