मुंबई: एका पादचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आरोपातून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एका महिलेची निर्दोष मुक्तता केली आहे. ग्रीन सिग्नल सुरू असताना हा पादचारी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दुर्घटनेला सदर महिलेला जबाबदार धरता येणार नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. २२ जानेवारी २०११ रोजी मरिन ड्राइव्ह परिसरात अपघात झाला होता. सदानंद भातडे असं मृताचं नाव आहे. ग्रीन सिग्नल सुरू असताना भातडे रस्ता ओलांडत होते. त्यामुळे अचानक ते कल्पना मर्चंट या महिलेच्या गाडीखाली आले आणि त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची चौकशी केली असता ही महिला वेगात गाडी चालवत नसल्याचं आढळून आलं. तसंच ग्रीन सिग्नल सुरू असताना सदर व्यक्ती रस्ता ओलांडत होती. त्यामुळे तो गाडीखाली आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं चौकशीत आढळून आलं. शिवाय प्रत्यक्षदर्शींनीही महिलेची काहीच चूक नसल्याचा जबाब नोंदवला होता. सदर महिला दोन्ही मीडल लेनमधून धीम्या गतीने गाडी चालवत होती. भातडे हे ग्रीन सिग्नल सुरू असताना अचानक गाडीखाली आले. उजव्या बाजूने ते गाडीखाली आले. त्यामुळे गाडीची जोरदार धडक बसल्याने ते जागीच कोसळले आणि बेशुद्ध पडले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्यांचा मृत्यू झाला होता, असं प्रत्यक्षदर्शींनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे कोर्टाने साक्षी आणि पुराव्याच्या आधारे सदर महिलेला क्लीनचिट दिली आहे.