
मुंबई : मूडीजने चालू वर्षासाठी जीडीपीचा वृद्धीदर ६.६ टक्क्यांवरून घटवून ५.४ टक्के केल्याचे पडसाद आज सकाळी शेअर बाजारात उमटले. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५८ अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८४ अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्स ४० हजार ८०० अंकांवर तर निफ्टी ११ हजार ९७० अंकांवर आहे. आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यास भारताला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे कारण देत मूडीजने सोमवारी चालू वर्षासाठी जीडीपीचा वृद्धीदर ६.६ टक्क्यांवरून घटवून ५.४ टक्के केला. गेल्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था कमालीच्या मंदगतीने वाटचाल करत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. २०१९ या वर्षासाठी मूडीजने जीडीपी वृद्धीदराचा अंदाज ५ टक्के घोषित केला होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच यंदाचा अर्थसंकल्प हा दिशाहीन आणि निराशाजनक असल्याची टीका पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्या अशिमा गोयल यांनी केली आहे. 'बजेट'मध्ये दूरदृष्टीचा अभाव असल्याचे सांगत गोयल यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. वाचा : सध्या 'टीसीएस', टेक महिंद्रा हे शेअर तेजीत आहेत. तर 'एसबीआय', मारुती, बजाज आॅटो, एशियन पेंट्स, एचडीएफसी, एनटीपीसी या शेअरमध्ये घसरण झाली आहे. वोडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये १२ टक्के घसरण झाली. सोमवारी निर्देशांक २०२ अंकांनी घसरला होता. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३७४ कोटींचे शेअर्स विक्री केले.