
मुंबई- नवऱ्याचा त्रास आणि घरगुती हिंसेला कंटाळून अजून एका कलाकाराने आपलं आयुष्य संपवलं. कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका सुष्मिताने सोमवारी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअप वॉइस मेसेज आईला पाठवला. यानंतर तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती २६ वर्षांची होती. मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिताने नवऱ्याला आणि सासरच्यांचा जाचाला कंटाळून आत्महत्या केली. सासरच्यांकडून हुंड्यासाठी सतत तिचा छळ होत होता. शरत कुमारशी सुष्मिताचं लग्न झालं होतं. शरत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. अन्नपूर्णेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी शरत फरार असल्याचं सांगण्यात आलं असून त्याचा शोध सुरू आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुष्मिताने आईला वॉइस मेसेज पाठवला. यात ती म्हणाली की, 'त्याला (नवऱ्याला) असंच सोडू नकोस. मला माफ कर. माझा छळ न करण्यासाठी मी त्याच्या लाखो वेळा विनवण्या केल्या, पण तो ऐकलाच नाही. मी माझ्याच कर्मांची शिक्षा भोगतेय. मी याबद्दल कधीही कोणाला सांगितलं नाही. माझ्या नवऱ्याने एक शब्दही मला कधी बोलू दिला नाही. तो नेहमी माझ्यावर ओरडायचा आणि घर सोडायला सांगायचा. मला त्याच्या घरी मरायचं नाही. मला माझं आयुष्य स्वतः च्या घरी संपवायचं आहे.' आपल्या घराची काळजी करत पुढे म्हणाली की, 'अम्मा मला तुझी खूप आठवण येते. मला माहितीये माझा छोटा भाऊ सचिन तुझी काळजी घेईल. आपल्या मूळ स्थानी घेऊन जा आणि माझे अंत्यसंस्कार करा. सचिनला माझे अंत्यसंस्कार करायला सांगा.' सध्या पोलीस सुष्मिताचा नवरा शरतचा शोध घेत आहेत.