
नवी दिल्ली : शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात काही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी सुरू असतानाच परिसरात बॉम्बच्या अफवेनं काही काळ एकच धुमाकूळ उडवून दिला. न्यायालय परिसरात सापडलेल्या एका वेबारस बॅगमधून आवाज आल्यानंतर ही लगेचच अफवा पसरली होती. यामुळे सुरक्षा रक्षकही धास्तावले पण त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेमुळे ही अफवा फारशी पसरली नाही आणि त्यामुळे कोर्टाच्या कामात अडथळाही निर्माण झाला नाही. त्याचं झालं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात एक बॅग बेवारसरित्या आढळली. या बॅगमधून टाईम मशीनसारखा आवाज येत होता. त्यामुळे नागरिकांसहीत सुरक्षा रक्षकही अलर्ट झाले. त्यांनी तत्काळा कोर्ट-४ च्या बाहेरचं क्षेत्र घेरलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगेबद्दल माहिती मिळाल्यानंतर लागलीच ही बॅग ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन ही बॅग रिकामी करण्यात आली. परंतु, बॅगमधून येणारा बीपचा आवाज एका पॉवर बँकमधून येत असल्याचं समोर आलं. पॉवर बँकसहीत ही नियंत्रण कक्षात जमा करण्यात आल्याचं सुरक्षा रक्षकांनी सांगितलंय. या घटनेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला मात्र कुठलाही अडथळा निर्माण झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उल्लेखनीय म्हणजे, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात निर्भया प्रकरणासहीत दूरसंचारच्या १.४७ लाख कोटी रुपयांच्या प्रकरणाच्या सुनावणीचा समावेश होता.