मुंबई: लोकांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र प्रयत्नशील असलेल्या राज्यातील पोलीस दलाला करोनानं विळखा घातला आहे. ताज्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल ७८६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रोजच्या रोज करोनाचे रुग्ण वाढत असल्यानं सरकारकडून निर्बंध अधिक कठोर केले जात आहेत. गर्दी टाळणं हा करोनाची साखळी तोडण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यासाठीच लॉकडाऊन पुकारण्यात आलं आहे. लॉकडाऊनचे निर्बंध पाळले जावेत याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. साहजिकच त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना कळत-नकळत पोलीस बाधितांच्या संपर्कात येत असल्यानं त्यांना संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७८६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. बाधित पोलिसांमध्ये ८८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या ७५ अधिकाऱ्यांसह ७०३ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७६ पोलिसांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात १३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, सात पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत पोलिसांवर हल्ल्याच्या २०० घटना घडल्या आहेत. या घटनांतील ७३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.