नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशात विविध भागांत अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आलीय. या 'श्रमिक स्पेशल' रेल्वेचा खर्च मात्र मजुरांनीच भरावा, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. यावर अखिलश यादव यांच्यासहीत अनेकांकडून चांगलीच टीका करण्यात आली. मात्र, आता काँग्रेस अध्यक्ष यांनी या गरीब मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केलंय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी सोशल मीडियावर मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केलं. सोबतच केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय. 'परदेशात अडकलेल्या भारतीयांना मोफत मायदेशात आणण्यात आलं पण गरीब कामगारांकडून मात्र तिकीटाचे पैसे वसूल केले जात आहेत. अशावेळी काँग्रेस कमेटीनं प्रत्येक गरजवंत श्रमिक आणि कामगाराचा घरी परतण्याचा रेल्वे खर्च स्वत:हून उचलण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील' काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलरवर जाहीर करण्यात आलेल्या सोनिया गांधींच्या वक्तव्यात म्हटलं गेलंय.