: राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिलीच आहे, तर आता उघडण्यासही परवानगी द्यावी. हवे तर यासाठी कडक नियम करावेत, मात्र आत्मशांतीसाठी आवश्यक असणारी मंदिरे खुली करावीत, अशी मागणी नगरच्या मंदिर बचाव कृती समिती व पंडित दीनदयाळ परिवारातर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीने वसंत लोढा यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून राज्यातील सर्व मंदिरेही बंद करण्यात आली आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता बदलायला हवी. यासाठी नागरिकांना आत्मिक शांती व समुपदेशनाची खूप गरज आहे. दुर्दैवाने समाजाला सन्मार्ग दाखवणारे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आता येणार नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांना आत्मिक शांती, प्रेरणा व श्रद्धा मिळण्याचे मंदिरे व धार्मिक स्थळे हे एकमेव स्थान आहे. राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या मंदिरांवर उदरनिर्वाह असणारे हजारो नागरिक आज मंदिरे बंद असल्याने मोठ्या संकटात सापडली आहेत. यात मंदिर परिसरातील व्यावसायिकांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत तातडीने निर्णय घेवून राज्यातील मंदिरे पुन्हा उघडण्यास परवानगी द्यावी. यासाठी कडक नियमावली करावी, जेणेकरून मंदिरांच्या माध्यमातून करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. यापुढील काळात आपल्याला करोना बरोबरच जगायचे आहे. यासाठी स्वयंशिस्त पाळणे ही काळाची गरज आहे. मंदिरे सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊन मंदिरात सोशल डिस्टन्सिंग व स्वछताबाबतचे सर्व कडक नियम पाळण्याची जवाबदारी मंदिराच्या पुजाऱ्यांवर सोपवली तर ते कर्तव्य म्हणून ही जबाबदारी पार पाडतील. कृपया पंडित दीनदयाळ परिवार व नगरच्या मंदिर बचाव कृती समितीवर तीव्र आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये.'