
मुंबई: मुंबईत दररोज दीड हजाराच्या आसपास करोनाचे रुग्ण सापडत असून रुग्णसंख्याही ७५ हजाराच्यावर गेली आहे. त्यामुळे डॉक्टरांप्रमाणेच पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी मुंबईकरांना घरापासून केवळ दोन किलोमीटरच्या आतच करण्याचे निर्बंध घातले आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ कार्यालयात जाण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी सामान्य माणसांना दोन किलोमीटर पर्यंतच्या परिसरात प्रवास करण्यासा परवानगी आहे. तसेच दोन किलोमीटरच्या बाहेर जाऊन खरेदी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, असं पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितलं. मुंबईकर वाहने घेऊन पिकनिकसाठी घराबाहेर पडताना दिसत असल्याचं चित्रं दिसू लागल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसांपूर्वी व्यायाम करण्यासाठी नागरिकांना मोकळ्या मैदानात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र दोन किलोमीटरच्या आतील मोकळ्या मैदानातच नागरिकांना व्यायाम करावा लागणार आहे. त्यापलिकडे त्यांना जाता येणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना मास्क लावावा, गजर असेल तरच घराबाहेर पडावे, अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणं टाळा, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा केलं आहे. हे लक्षात ठेवा >> शॉपिंगसाठी किंवा सलूनमध्ये केस कापायचे असेल किंवा अन्य महत्त्वाची कामे असतील तर घरापासून दोन किलोमीटरच्या अंतरातच जाण्यास मुभा आहे. >> कार्यालयात जाण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी सामान्य माणसांना दोन किलोमीटर पर्यंतच्या परिसरात प्रवास करण्यासा परवानगी आहे. ही काळजी घ्या >> घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा >> विनाकारण घराबाहेर पडू नका ... तर कारवाई होणार >> कारण नसताना वाहने घेऊन रस्त्यावरून फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत काल १३०० करोनाबाधित सापडले. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या ७५ हजार ४७ झाली आहे. तर २३ जणांचा काल मुंबईत मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४ हजार ३६९ झाली आहे. काल ८२३ रुग्ण करोनातून मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ४३ हजार १५४ रुग्ण बरे झाले आहेत.