शेअर बाजार; कालच्या पडझडीचा निर्देशांकांवर प्रभाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 10, 2020

शेअर बाजार; कालच्या पडझडीचा निर्देशांकांवर प्रभाव

https://ift.tt/2Yi5CK5

मुंबई : मागील काही सत्रातील तेजाने वधारलेल्या शेअरची विक्री करून नफ वसुली केल्याने मंगळवारी शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली होती. आजही तो दबाव कायम राहील, असे अंदाज वर्तवले जात आहेत. काल मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४१३.८९ अंकांनी घसरत ३३,९५६.६९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२०.८० अंक खाली येत १०,०४६.६५ या पातळीवर स्थिरावला.

काल निफ्टी १०१०० ची पातळी तोडली. त्यामुळे आता तो आणखी कमकुवत होऊन ९८५० ते ९९०० च्या पातळी दरम्यान राहील, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. नफावसुलीने निफ्टीच्या घोडदौडीला लगाम लागला. निफ्टीसाठी १०३०० ची पातळी निर्णायक राहील, असे जिओजित फायनान्शिअलचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.

काल सेन्सेक्सच्या यादीतील आयसीआसीआय बँकेला सर्वाधिक तोटा होऊन तिचा समभाग तीन टक्के घसरला. त्यापाठोपाठ भारती एअरटेल, एचडीएपसी बँक, बजाज फायनान्स, कोटक बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग खाली आले. इंडसइंड बँक, सन फार्मा, महिंद्र अॅण्ड महिंद्र व एचडीएफसी यांचे समभाग मात्र वधारले. सेन्सेक्स ठरवणाऱ्या ३० कंपन्यांपैकी २१ नकारात्मक स्तरावर गेल्या

भारतीय गुंतवणूकदार अर्थव्यवस्थेचा गाडा रुळांवर येण्याबाबत साशंक असले तरी, जगभरातील भांडवल बाजारांत सरसकट तशी स्थिती दिसून आली नाही. अनेक देशांतील लॉकडाउन काढल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल, असा विश्वास गुंतवणूकदारांनी व्यक्त केला आहे.अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी घसरून ७५.५७च्या पातळीवर बंद झाला. जगभरातील अन्य चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने आणि देशांतर्गत बाजारातील घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाल्याचे पाहायला मिळाले.

मंगळवारी अमेरिकेतल्या शेअर बाजारांमधील तेजीला ब्रेक लागला. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी बाजारात मोठी विक्री झाली. डाऊ जोन्स ३६२ अंकांनी घसरला होता. एस अँड पी ५०० ३३ अंकांनी तर नॅसडॅक निर्देशनकांत ३२ अंकांनी घसरण झाली. त्यामुळे आज भारतीय बाजारांवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.