
चुरू: राजस्थानच्या येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही गुंडांनी एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजारी वडिलांसाठी ३२ वर्षीय विधवा महिला औषध आणायला घराबाहेर पडली होती. आरोपींनी तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी हनुमानगढच्या पल्लूमध्ये १० दिवस तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपी देवीलालसह अन्य तिघांविरोधात तिने तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात नेले. तेथे तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पतीच्या निधनानंतर वडिलांसोबत राहत होती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पतीचा मृत्यू झाल्यानंतर महिला आपल्या वडिलांसोबत राहत होती. १५ दिवसांपूर्वी वडील आजारी झाले होते. त्यांच्यासाठी औषध आणण्यासाठी ती जात होती. त्याचवेळी आरोपी देवीलाल याने तिला जबरदस्ती गाडीत बसवले आणि सरदारशहर रस्त्यालगत असलेल्या एका घरात तिला नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तिला पल्लू येथे घेऊन गेला. १० दिवस त्या ठिकाणी डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. जीवे मारण्याची धमकी बलात्कारानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीचे नातेवाइक चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून तिला बेशुद्ध करत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.