
मुंबई: नेते यांनी थेट भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपला फटकारले आहे. भाजपने खुलेआम 'मन की बात' सांगावी, नारायण राणे यांचा खांदा वापरू नये, असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते यांनी ट्विट करून भाजपला हा टोला लगावला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही नारायण राणे यांची वैयक्तिक मागणी आहे. ती भाजपची अधिकृत मागणी नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. आता तिच मागणी राणे यांनी भाजच्या मुख्यालयातूनच केली आहे, असं सांगतानाच भाजप राणेंचा खांदा का वापरत आहे. खुलेआम मन की बात सांगा. लोकांना तुमचा कुटील डाव कळू तर दे, असं आव्हानच सचिन सावंत यांनी भाजपला केलं आहे. नारायण राणे यांनी काल भाजपच्या मुख्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री डोळे मिटून लॉकडाऊन करत सुटले आहेत. मागचापुढचा कोणताही विचार केला जात नाही. लॉकडाऊन करायला हवं पण कुठपर्यंत तेही ठरवायला हवं. लॉकडाऊन वाढत असताना प्रत्येक महिन्यात नवे प्रश्न उभे राहत आहेत, असं सांगतानाच राज्यातील करोना रोखण्यात ठाकरे सरकारला अपयश आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी राणे यांनी मुंबईतील करोना रुग्णांची आकडेवारी सादर करून सरकारला धारेवर धरले. करोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत ५ हजारावर तर राज्यात ८ हजारावर बळी गेले आहेत. ही स्थिती असतानाही सरकार जराही गंभीर नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न हाताळले जात नाहीत. राज्याच्या मंत्रालयात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीच बसत नाही. सगळा कारभार मातोश्री या निवासस्थानातून चालवला जातो. हे असंच चालणार असेल तर ज्या सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय असं केलं होतं ते नाव आता पुन्हा एकदा सचिवालय करावं लागेल, असा टोलाही राणे यांनी लगावला होता.