
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री यांची राजकारणात एन्ट्री होत असून लवकरच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रिया यांच्यासोबतच अनेक कलाकारमंडळी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. येत्या ७ जुलैरोजी प्रिया बेर्डे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु स्वत: प्रिया बेर्डे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना पडद्यामागंही अनेक लोकं काम करत असतात. यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं प्रिया बेर्डे म्हणाल्या.'पडद्यामागे काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग हा महत्त्वाचा वाटतो,' अशी प्रतिक्रिया प्रिया बेर्डे यांनी दिली होती. अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, निर्माते संतोष साखरे , लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकमहेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. प्रिया बेर्डे यांच्या पक्ष प्रवेशावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा यांनी देखील प्रिया बेर्डे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 'सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करत असून त्यांचं मी स्वागत करते. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून कलाकारांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्यात आली होती.नाट्यपरिषदेला देखील मदत केली होती. कलाकार, लोक कलावंतांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती. करोनाच्या या कठिण काळात राष्ट्रवादी काँग्रेस कलाकारांच्या पाठिशी उभा राहिल्यामुळं प्रिया बेर्डे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी हा पक्ष आपला पक्ष वाटतो. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि कला विभागाच्या वतीनं सातत्यानं कलाकारांच्या समस्या सोडवल्या जातात. या विभागाच्या वतीनं प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळेल, त्यांचं मी स्वागत करते', असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. प्रिया बेर्डे सध्या पुण्यातून लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रिया बेर्डे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती असून पुण्यातूनच नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं आहे.