हँडवॉशची चोरी...सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा; पण धारावीला 'या' मॉडेलने तारले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 6, 2020

हँडवॉशची चोरी...सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा; पण धारावीला 'या' मॉडेलने तारले!

https://ift.tt/2VNCQ3N
मुंबई: धारावीत करोनावर नियंत्रण आणताना पालिका अधिकाऱ्यांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागला. धारावीत करोनाचा संसर्ग वाढू नये, स्वच्छता राखली जावी म्हणून सुरुवातीला शौचालयात ठेवलेले हँडवॉशही लोकांनी चोरून नेले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाला. या सारख्या असंख्य अडचणी आल्या. पण 'चेस द व्हायरस' ही मोहीम हाती घेऊन अखेर पालिकेला करोनावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. ज्या धारावीत सुरुवातीला दररोज ८० ते ९० रुग्ण सापडायचे तिथे आज १०च्या आत रुग्ण सापडत आहेत. शिवाय धारावीतील करोना मृत्यू रोखण्यातही पालिकेला यश आले आहे. जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली धारावीतील करोना नियंत्रणात आणण्याचं काम जोरात सुरू आहे. चेस द व्हायरसची मोहीम, स्क्रीनिंग, फिवर क्लिनिक, सर्व्हे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, क्वॉरंटाइन सेंटरच्या संख्येत वाढ आणि सार्वजनिक स्वच्छता आदी उपाययोजनांमुळे धारावीतील करोना नियंत्रणात आणण्यात यश आल्याचं किरण दिघावकर यांनी सांगितलं. १ एप्रिल रोजी धारावीत करोनाचा पहिला रुग्ण सापडला. धारावीत ८० टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. येथील लोकसंख्या ८ ते १० लाख असून एका छोट्याशा घरात १० ते १५ लोक राहतात. त्यामुळे संसर्गामुळे या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होईल अशी सुरुवातीला भीती होती. कारण लोकांना होम आयसोलेशन करणंही शक्य नव्हतं आणि एवढ्याशा घरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणंही शक्य नव्हतं, असं दिघावकर म्हणाले. करोनाचे रुग्ण वाढायला लागले तेव्हा आम्ही चेस द व्हायरस ही मोहीम हाती घेतली. त्यानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, फिवर कँप, लोकांना आयसोलेट करणं आणि टेस्टिंगची संख्या वाढणं यावर जोर दिला. शाळा आणि महाविद्यालयांनाच क्वॉरंटाइन सेंटर बनवलं. क्वॉरंटाइन सेंटरमधील लोकांना तीनवेळचं चांगलं जेवण दिलं. डॉक्टरांची फौज तैनात केली, त्याचा बराच फायदा झाला. आम्ही सुमारे ११ हजार लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे ७७ टक्के लोक करोनामुक्त होऊन घरी गेले. सध्या इथे फक्त २३ टक्के अॅक्टिव्ह केसेस आहेत, असं दिघावकर म्हणाले. आम्ही धारावीत १२ क्वॉरंटाइन सेंटर बनवले होते. त्यातील आता ३ बंद केले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. धारावीला करोनामुक्त करण्याचा अभ्यास करून आम्ही एक टीम तयार केली. या ठिकाणी सफाई कामगारांपासून ते स्वयंपाक्यापर्यंत असे २४५० कामगार कार्यरत होते. १२५० लोकांची वैद्यकीय टीम कॉन्ट्रॅक्टवर काम करत होती. त्यात १२ ते १३ डॉक्टर होते. धारावीत ४५०हून अधिक सार्वजनिक शौचालये आहेत. सार्वजनिक शौचालयातून करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे सुरुवातीला दिवसातून तीन वेळा ही शौचालये सॅनिटाइज केली जायची. नंतर दिवसातून ५ ते ६ वेळा शौचालये सॅनिटाइज केली जाऊ लागली. शौचालयांमध्ये हँडवॉशही ठेवले होते. पण सुरुवातीला लोकांनी ते चोरून नेले. त्यानंतर पुन्हा शौचालयात हँडवॉश बसवावे लागले. डेटॉल आणि हिंदुस्थान यूनिलिव्हर कंपनीने मोठ्या प्रमाणावर हँडवॉश उपलब्ध करून दिले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साबणांचं वाटपही करण्यात आलं. एनजीओसह इतर संस्था, संघटनांनीही खूप मदत केली, असंही त्यांनी सांगितलं.