
मुंबई: कानपूर येथील हत्याकांडाने उत्तर प्रदेशातील ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सरकारची पोलखोल केली आहे. या हत्याकांडामुळे ४० वर्षांपूर्वी झालेल्या ११ पोलिसांच्या हत्याकांडाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. ४० वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय?,' अशा शब्दांत शिवसेनेनं योगी सरकारवर निशाणा साधला आहे. कानपूरमध्ये पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे नेपाळमध्ये पळाल्याच्या बातम्या आहेत. त्यावरूनही शिवसेनेनं टोला हाणला आहे. 'सध्या नेपाळशी आपले संबंध चांगले नाहीत. त्यामुळं हा विकास दुबे आपल्यासाठी 'नेपाळमधील दाऊद' ठरू नये, अशी भीती शिवसेनेनं व्यक्त केली आहे. ( slams government) भाजपला दूर सारून शिवसेनेनं महाराष्ट्रातील सत्ता ताब्यात घेतल्यापासून भाजप-शिवसेनेमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेची संधी सोडत नाहीत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांबरोबरच इतर राज्यांतील व केंद्रातील भाजपचे नेतेही शिवसेनेला लक्ष्य करत असतात. पालघर येथे झालेल्या साधूंच्या झुंडबळीच्या घटनेनंतर योगी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर यूपीत झालेल्या साधूंच्या हत्येवरून शिवसेनेनं योगी सरकारला लक्ष्य केलं होतं. आता कानपूरमध्ये विकास दुबे या गुंडाच्या टोळीनं केलेल्या हल्ल्यात आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून शिवसेनेनं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'गुंड टोळ्या आणि त्यांच्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेशसारखे राज्य दशकानुदशके बदनाम राहिले आहे. विद्यमान योगी सरकारनं उत्तर प्रदेशमधील गुंडागर्दी संपुष्टात आणली असे दावे अनेकदा केले गेले. मात्र कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांची उत्तरे योगी सरकारलाच द्यावी लागतील. म्हणजे उत्तम प्रदेश असे म्हटले जाते. उत्तम प्रदेश पोलिसांच्या रक्ताने भिजला. देशाला हा धक्का आहे. आज जनता करोना लॉकडाऊनमध्ये बंदिस्त आहे. उद्या गुंडांपासून सुरक्षित राहण्यासाठी लॉक डाऊनमध्ये राहावे लागेल का, असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा: 'कायद्याऐवजी गुंडांचे ‘हाथ लंबे’ असल्यामुळेच हे हत्याकांड झाले. हे असेच सुरू राहिले तर ‘घर घर से अफझल’ निर्माण होतील का याची कल्पना नाही, परंतु उत्तर प्रदेशात ‘घर घर से विकास दुबे’ मात्र निर्माण होऊ शकतील. उत्तर प्रदेशमधील गुंडगिरीचे परिणाम देशाची राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबईवरही होत असतात. त्यामुळे कानपूरचे पोलीस हत्याकांड हा गंभीर चिंतेचा विषय आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. योगी सरकारच्या मागील तीन वर्षांत पोलिसांनी ११३ पेक्षा जास्त गुंडांचे ‘एन्काऊंटर’ केले, पण त्यात विकास दुबे हे नाव कसे राहिले? त्याच्यावरही खून, दरोडे, लूट अशा ६० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र पुराव्यांअभावी तो त्यातून वाचला कसा? पोलीसच त्याच्या बाजूने साक्षीदार कसे बनत होते? उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारच्या सोयीनुसार एन्काऊंटरची यादी बनवली जात आहे का? असे आरोप कोणी केले तर त्याचा काय खुलासा योगी सरकारकडे आहे?,' असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.