
राजस्थान: महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. शेजाऱ्याने बलात्कार केल्यानंतर तरुणीने स्वतःला पेटवून घेतले आहे. यात तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बुंदी जिल्ह्यातील गेंदौली परिसरातील चौतरा का खेडा गावात ही धक्कादायक घटना घडली. एका झाल्यानंतर तिने स्वतःला पेटवून घेतले. पीडित तरुणीच्या शेजाऱ्याने रविवारी तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे व्यथित झालेल्या तरुणीने सोमवारी सकाळी स्वतःला पेटवून घेतले. यात तिचा मृत्यू झाला आहे. तरुणीने स्वतःला पेटवून घेतले की, तिला जाळून मारण्यात आले याबाबत संदिग्धता आहे. कारण स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीने रविवारी रात्री तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तिच्यावर डिझेल ओतून पेटवून दिले, असा आरोप तरुणीच्या मामाने केला आहे. तरुणीला पेटवल्यानंतर पळून जाताना आरोपीला तिच्या आईने पाहिले असल्याचे वृत्त आहे. तर, एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बलात्कार झाल्यानंतर व्यथित झालेल्या तरुणीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. बुंदी जिल्हा रुग्णालयात तरुणीचा मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल, असे गेंदौली पोलीस ठाण्याचे अधिकारी एजाज अहमद यांनी सांगितले.