
नवी दिल्ली: जेवण दिलं नाही म्हणून मद्यधुंद तरुणाने आपल्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दारू पिऊन घरी आल्यानं आई नाराज होती. त्यामुळं तिनं जेवण देण्यास नकार दिला. यावरून रागाच्या भरात तरुणानं आईवर गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या केली. आईवर गोळ्या झाडून तिची हत्या करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. बवानामध्ये ही धक्कादायक घटना घडली. सूरज (२६) असं या तरुणाचे नाव आहे. सूरज रोज रात्री दारू पिऊन घरी येत असे. यावरून आई बाला देवी (वय ६०) ही त्याच्यावर नाराज होत असे. त्यानंतर आईशी तो वाद घालत होता. गुरुवारी रात्री तो घरी आला. दारुच्या नशेत होता. त्याने आईकडे जेवण मागितलं. त्यावर आईनं त्याला जेवण दिलं नाही. तो रागात खोलीत गेला आणि गावठी पिस्तुल तो घेऊन आला आणि आईवर गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, बाला देवी या कुटुंबासह बवाना गावात राहत होत्या. कुटुंबात दोन मुली आणि तीन मुलं आहेत. बाला यांच्या पतीचं निधन झालं आहे. दोन मोठी मुलं पेंटर असून, सूरज वाहनचालक आहे. सूरज हा रोज दारू पिऊन घरी येतो. त्यामुळं आई नेहमी त्याच्यावर नाराज असायची. गुरुवारी रात्री १२ वाजता आरोपी नशेत घरी आला. बाला देवी या रागावल्या. त्यावर सूरजनं त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तो खोलीत असलेलं पिस्तुल घेऊन आला. त्यातून बाला देवी यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानं त्या जागीच कोसळल्या. या प्रकरणी आरोपी सूरजला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्तुलही जप्त करण्यात आलं आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. सूरजची चौकशी करण्यात येत असून, पिस्तुल कुठून आणलं याचा तपास करत आहेत.