भयानक! डंपिंग ग्राऊंडचा कचऱ्याचा डोंगर कोसळला; ८ घरे जमीनदोस्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 6, 2020

भयानक! डंपिंग ग्राऊंडचा कचऱ्याचा डोंगर कोसळला; ८ घरे जमीनदोस्त

https://ift.tt/3e4nY7p
ठाणे: मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मिरा-भाईंदर येथील डंपिंग ग्राऊंडमधील कोसळून ८ घरे जमीनदोस्त झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुदैवाने या घरांमधील लोक तात्काळ बाहेर पडल्याने ३० जण बचावले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मिरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून घरे जमीनदोस्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या डंपिंग परिसरात राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मिरा-भाईंदरमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळे उत्तन परिसरातील डंपिंग ग्राऊंडमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजता झोपण्याच्या तयारीत असतानाच डंपिंग ग्राऊंडचा कचरा खसला आणि या झोपड्यांवर पडण्यास सुरुवात झाली. घरांच्या पत्र्यांवर कचरा आदळत असल्याचा मोठमोठ्याने आवाज आल्याने काही तरी अघटीत घडतंय अशी भीती वाटून घरातील लोक तात्काळ बाहेर पडले आणि त्यांच्यासमोरच काही क्षणात कितीतरी टन कचरा त्यांच्या घरावर पडला आणि त्यांची घरे या कचऱ्यात गाडली गेली. काही क्षणात आपल्या डोळ्यासमोरच संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने अनेकांनी हंबरडाही फोडला. कपडेलत्ते, भांडी, घरातील सर्व सामान आणि थोडीशी जमा केलेली पुंजीही या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. केवळ अंगावरील कपडेच तेवढे काय वाचले. या आठही घरांवर ओला कचरा पडल्याने हा कचरा हटवणेही कठिण होते. कचरा कोसळल्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालं. रात्रीची वेळ असल्याने कचरा हटवणेही शक्य नव्हते. त्यातच पाऊस असल्याने या रहिवाशांची पंचाईत झाली. अनेकांनी शेजाऱ्यांच्या घरात रात्र काढली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. डंपिंगमध्ये कचरा टाकण्यात अनियमितता आहे. नियमांचं उल्लंघन करून डंपिंगमध्ये कुठेही कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असं सांगतानाच ज्यांची घरे या कचऱ्यात गाडली गेली, त्यांना पालिकेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गंडोली यांनी केली. दरम्यान, या डंपिंग ग्राऊंडमध्ये सुमारे १० लाख मॅट्रिक टनाहून अधिक कचरा आहे. त्याची ऊंची ५० ते १०० मीटर आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक भागात सलग तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मुंबईत तर मुंबई पोलिसांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहनही केलं होतं.