मुंबई: करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'करोनाच्या विघ्नातून राज्याला लवकरात लवकर मुक्ती मिळो,' असं साकडं दोघांनीही गणरायाला घातलं आहे. महाराष्ट्रासह देशात करोनाची साथ असल्यामुळं प्रत्येक सणउत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं सुरुवातीपासूनच केलं आहे. आतापर्यंतच्या सर्व उत्सवांमध्ये जनतेनं या आवाहनास प्रतिसाद दिला. जन्माष्टमी, दहीहंडी यांसह अनेक सण साधेपणाने व शक्यतो घरीच साजरे करण्यात आले. गणेशोत्सवही याच पद्धतीनं साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही सरकारच्या नियमांचे पालन करण्याची ग्वाही दिली आहे. उत्साह कायम असला तरी सर्व प्रकारची काळजी घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच ट्वीट करून जनतेला उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षी प्रमाणे यंदाही करतो आहोत, मात्र यावेळेस आपल्यासमोर करोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. तसंच, या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो,' अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा देताना श्रीगणरायांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्र लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 'बुद्धीची देवता श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सण साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळं राज्यातील कोरोना संसर्ग रोखला जाईल,' असं त्यांनी म्हटलं आहे.