
वल्लभगढ: प्रियकराच्या सोबत हॉटेलात आलेल्या महिलेला तिच्या पतीने आणि दिराने रंगेहाथ पकडले. संतप्त झालेल्या पतीने तिला आणि तिच्या प्रियकराला मारहाण केली. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. तिथे मोठ्या संख्येने लोक जमले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबीयांना बोलावले आहे. शहर पोलिसांनुसार, पलवल येथील असावती गावात राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न तीन वर्षांपूर्वी फिरोजपूर कला गाव येथील तरुणीसोबत झाले होते. लग्नाच्या आधी या तरुणीचे पलवलच्या कोंडल गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असे. लग्नानंतरही पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तिचा शोध घेतल्यानंतर ती सापडली. त्यानंतर पतीने तिला घरी घेण्यास नकार दिला होता. दोघांच्या कुटुंबीयांनी चर्चा केल्यानंतर त्याने पुन्हा घरी आणले. ती पतीसोबत राहत होती. मात्र, ३ दिवसांपूर्वी ही महिला आपल्या वडिलांकडे आली होती. महिलेचा पती मुजेसर येथील एका कंपनीत काम करत आहे. सोमवारी महिलेच्या पतीने मेहुण्याला फोन करून सासऱ्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने पत्नीबद्दलही विचारणा केली. तर ती आई आणि बहिणीसोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेल्याचे कळले. साधारण १० वाजता त्याच्या एका नातेवाइकाचा फोन आला. पत्नी एका तरुणासोबत वल्लभगढमधील चावला कॉलनी परिसरात फिरतेय असे त्याने सांगितले. त्यानंतर पती या परिसरात पोहोचला. त्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. तेथील एका हॉटेलात गेल्यानंतर तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर एका खोलीतून बाहेर पडताना दिसले. ते दोघे हॉटेलबाहेर पडताच, पतीने दोघांनाही मारहाण केली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. जवळपास ३० मिनिटांनी पोलीस तेथे पोहोचले. महिला आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोघांच्या कुटुंबीयांना बोलावले आहे. तक्रार मिळाली तर, पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.