मुंबई : सोने आणि चांदीवर नफावसुलीचा दबाव कायम राहिल्याने सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आज शुक्रवारी सलग पाचव्या सत्रात सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याला स्थिरस्थावर होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०१५६ रुपये आहे. त्यात १६४ रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी सोने ४९९९२ रुपयांवर बंद झाले होते. चांदीमध्ये आज तेजी आहे. एक किलोला ६१९२४ रुपये आहे. त्यात ४१४ रुपयांची वाढ झाली आहे. मागील सत्रात सोने ३५० रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीचा भाव १००० रुपयांनी कमी झाला होता. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या यशस्वी चाचण्यांनी भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली होती. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला होता. मात्र अमेरिकेत करोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.२ टक्क्यांनी कमी झाला असून तो प्रती औंस १८६३.२१ डॉलर झाला. चांदीचा भाव प्रती औंस ०.१ टक्क्यांनी घसरला असून तो २४.०६ डॉलर आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात नफावसुली दिसून आली. त्यामुळे सोन्याचा भाव १९०० डॉलर खाली आला असल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटलं आहे. नजीकच्या काळात सोन्यात चढ उतार दिसून येतील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९८६० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०८६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९३७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३८५० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ५००५० रुपये मोजावे लागतील. तर २२ कॅरेटचा भाव ५२४५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४७४५० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५१८३० रुपये आहे.