
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई रिपब्लिक वाहिनी व इतर काही वाहिन्यांचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढविल्याप्रकरणी 'बार्क'च्या दोन उच्चपदस्थ माजी अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर 'बार्क'मधील अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत. आणि हे दोघे या घोट्याळ्याचे सूत्रधार असल्याने 'बार्क'मध्ये काम करणाऱ्या आणखी काही आजी-माजी अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. टेलिव्हिजन क्षेत्राला हादरविणारा '' उघडकीस आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात पंधरा आरोपींना अटक केली आहे. 'हंसा' कंपनीचे माजी कर्मचारी, जाहिरात एजन्सीचे पदाधिकारी, वाहिन्यांचे चालक-मालक आणि आता टीआरपी ठरविण्याचे अधिकार असलेल्या 'भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल'चे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता आणि सीओओ रोमिल रामगडिया या दोघांना अटक करण्यात आली. दोघे उच्च पदावरील माजी अधिकारी असून संस्थेत कार्यरत असताना दोघांनी 'रिपब्लिक वाहिनी'ला टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी मदत केल्याचे तांत्रिक पुराव्यांवरून समोर आले आहे. अधिकाऱ्यांचे ई-मेल; तसेच सोशल मीडियावरून झालेले संभाषण यांतून रिपब्लिक वाहिनीला इतर वाहिन्यांच्या पुढे नेऊन ठेवण्यासाठी काय सल्ले दिले गेले, काय केले गेले याबाबतचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पार्थ दासगुप्ता यांनी इतर सहकाऱ्यांच्या संगनमताने 'टाइम्स नाऊ' वाहिनीला मागे टाकून 'रिपब्लिक टीव्ही'ला टीआरपीत वर नेल्याचे दिसत आहे, असे शुक्रवारी गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी देखील सांगितले. पार्थ दासगुप्ता आणि रोमिल रामगडिया या दोन अधिकाऱ्यांना संस्थेतील इतर काहींची मदत मिळत होती असा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या दृष्टीने त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. टीआरपीमध्ये फेरफार केल्याच्या तक्रारी आल्यानंतर 'बार्क'ने केलेल्या अहवालात काही मनोरंजन वाहिन्यांच्या टीआरपीमध्येही संशयास्पद चढ-उतार झाल्याचे दिसून येत आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत सहा वाहिन्यांचा सहभाग आढळला असून ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. इतर आरोपींचा माग मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपींना कस्टडीसाठी न्यायालयात हजर करताना दहापेक्षा अधिक जणांना आरोपी केले आहे. यामध्ये 'रिपब्लिक टीव्ही'चे चालक मालक आणि इतर पदाधिकारी, महामुव्ही आणि वॉव या दोन वाहिन्यांचे पदाधिकारी; तसेच रॉकी आणि इतर आरोपींचा समावेश आहे. पोलिसांचे पथक या आरोपींचा माग घेत असून यातील काहींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.