मुंबई : काम करण्याची जिद्द, तपास कौशल्याच्या जोरावर मुंबई पोलिस दलात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे हे सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या अभिनयामुळे. कर्तव्य बजावतानाच सरकारी परवानगीने पाटील आपली अभिनयाची आवडही जोपासत आहेत. सोनी, सब टीव्हीवरील मालिकांमध्ये पाटील चमकदार भूमिका बजावत आहेत. आगामी काळामध्ये पाटील प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्येही झळकणार असून, त्यासाठी त्यांनी काही ऑडिशनही दिल्या आहेत. शासकीय सेवेत कर्तव्य बजावताना सरकारी परवानगीने इतर क्षेत्रात काम करणारे पाटील मुंबई पोलिस दलातील बहुदा पहिले अधिकारी आहेत. नागपाडा, पायधुनी आणि सध्या वरळी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक लीलाधर पाटील यांना गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपासाबद्दल आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक बक्षिसे मिळाली आहेत. कर्तव्य चोख बजावताना आपल्याला अभिनयाचा छंद कसा पूर्ण करता येईल याचा विचार पाटील यांचा सुरू होता. शासकीय सेवेत असूनही दुसऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची त्यांनी माहिती काढली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक अधिनियम १९७९ याबाबत समजले. याआधारे त्यांनी राज्य शासनाच्या गृहविभागाकडे परवानगी मागितली. कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करण्याची परवानगी सरकारने त्यांना दिली. ही परवानगी मिळताच त्यांना , तेरा यार हू में, क्राइम स्टॉप या मालिकांमध्ये पाटील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. अभिनय करतानाच आपल्यासाठी ड्युटी फर्स्ट असल्याचे पाटील सांगतात. वैयक्तिक जीवनही चित्रपटाप्रमाणे जळगावच्या दोनगावचे असलेल्या पाटील यांचे वडील गडीकाम करायचे. घरची परिस्थिती प्रचंड गरिबीची होती. पाटील यांनी देखील पापड कंपनीमध्ये मजुरी करीत शिक्षण घेतले. आधी आयटीआयमधून इलेट्रीक डिप्लोमा केला. त्याआधारे ते गावामध्ये इलेट्रीकची कामे करू लागले. ते करता करता त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डीएड करून शिक्षक होण्याचे त्यांनी ठरविले. मात्र, यामध्ये त्यांना यश आले नाही. पाटील यांनी कला क्षेत्रात पदवी संपादन केली. हुशारी पाहून त्यांना एमपीएसीची परीक्षा देण्याचा सल्ल्ला काहींनी दिली. परीक्षा देत होते, परंतु त्यातही सुरुवातीला यश येत नव्हते. त्यामुळे ज्या खासगी क्लासमध्ये ते शिक्षण घेत होते त्याच क्लासमध्ये त्यांनी मुलांना शिकविण्यास सुरुवात केली. यादरम्यान 'स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण' या पुस्तकाचे लेखन; तर 'स्पर्धा परीक्षा शब्दसामर्थ्य' या पुस्तकाचे संकलन त्यांनी केले. ही दोन्ही पुस्तके स्पर्धा परीक्षांना बसलेल्यांना उपयुक्त ठरत आहे. शिकवता शिकवता अखेर परीक्षा उत्तीर्ण झाले आणि २०१२मध्ये पोलिस दलात दाखल झाले. पत्नीला आश्चर्याचा धक्का करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पाटील यांनी पत्नी आणि मुलांना गावी पाठविले. अभिनयाच्या क्षेत्रात प्रयत्न करीत असल्याची काहीच कल्पना त्यांनी पत्नीला दिली नव्हती. २४ नोव्हेंबरला त्यांनी पत्नीला फोन करून क्राइम पेट्रोल मालिका पाहण्यास सांगितले. पतीला टीव्हीवर आणि ते देखील पोलिसाच्या भूमिकेत पाहून त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना इतका आनंद झाला की, पतीला काय प्रतिक्रिया द्यायची हेच त्यांना कळत नव्हते.
https://ift.tt/3mPRWAZ