नागपूर: दिवसाढवळ्या थरार; 'ती' टाळत होती, बॉयफ्रेंडने भररस्त्यात गाठलं अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 9, 2020

नागपूर: दिवसाढवळ्या थरार; 'ती' टाळत होती, बॉयफ्रेंडने भररस्त्यात गाठलं अन्...

https://ift.tt/3n17ZvY
म. टा. प्रतिनिधी, : भररस्त्यात चाकूने वार करून प्रियकराने २५ वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी नंदनवनमधील केडीके कॉलेज मार्गावरील परिसरात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. भारत बंददरम्यान पोलिसांचा बंदोबस्त असताना तरुणीवरील खुनी हल्ल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. जखमी मोनालिका (बललेले नाव) तरुणीवर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोर प्रियकर प्रशांत देवेंद्र भारसागळे (वय २४ रा. देवरी, जि.गोंदिया) याला अटक केली आहे. मोनालिका हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. प्रशांत हा गोंदियात खासगी काम करतो. दीड वर्षांपूर्वी मोबाइलवरील मिस्ड कॉलमुळे मोनिका व प्रशांतची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रशांत हा मोनालिकावर जिवापाड प्रेम करायला लागला. गत १५ दिवसांपासून मोनालिका प्रशांत याला टाळायला लागली. प्रशांत हा तिच्या मोबाइलवर संपर्क साधायचा. मात्र ती प्रतिसाद देत नव्हती. मोनिलिका सकाळी ११ वाजता हॉस्पिटलमधून घरी जात होती. राजेंद्रनगर भागात प्रशांत याने तिला अडविले. काही कळायच्या आत प्रशांत याने चाकूने सपासप मोनालिकाच्या गळ्यावर,पोटावार वार केले. तिने मदतीसाठी आरडा-ओरड केली. नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांनी प्रशांत याला पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान अन्य नागरिकांनी मोनालिकाला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गस्तीवर असलेल्या पोलिसांना नागरिकांची गर्दी दिसली. पोलिस तेथे पोहोचले. नागरिकांच्या तावडीतून प्रशांत याची सुटका केली. त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणले. मोनालिका टाळत असल्याने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे प्रशांत याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून प्रशांत याला अटक केली आहे. मोनालिकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मोनिका किरणापुरे हत्याकांडाला उजाळा नंदनवनमधील केडीके कॉलेजजवळ मोनिका किरणापुरे या विद्यार्थिनीची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. ११ मार्च २०११ ला ही घटना घडली. मोनालिकावरील खुनी हल्ल्याने मोनिका किरणापुरे हत्याकांडाची आठवण मंगळवारी पुन्हा ताजी झाली.