
गोरखपूर: उत्तर प्रदेशात 'मिशन शक्ती' मोहीम राबवण्यात येत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा दावा केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे हा दावा फोल ठरल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका तरुणीवर झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीचं करून तिला रात्रभर डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या खोराबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. २१ डिसेंबर रोजी रात्री तरुणी घरात झोपली होती. त्याचवेळी गावातील चिकन बिर्याणी विक्रेत्या तरुणाने तिचे अपहरण केले. तिला दुकानात डांबून ठेवले. रात्रभर तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या घराजवळ सोडले. या घटनेमुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला होता. पालकांनी विचारलं असता, पीडितेने घडलेली घटना सांगितली. पीडितेच्या आईने आरोपी तरुणाविरोधात खोराबार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी हा मूळचा गोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. गावातील चौकात त्याचे बिर्याणीचे दुकान आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. पीडितेचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.