करोनाच्या नव्या विषाणूची भीती; प्रवास बंदीमुळे ब्रिटन एकाकी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

करोनाच्या नव्या विषाणूची भीती; प्रवास बंदीमुळे ब्रिटन एकाकी

https://ift.tt/38tah15
लंडन: ब्रिटनमध्ये विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर विविध देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. याशिवाय फ्रान्सने ब्रिटनमधून येणाऱ्या ट्रकवर बंदी घातल्याने हजारो मालवाहू ट्रक अडकून पडले आहेत. याशिवाय, अनेक प्रवासी विमानतळांवर अडकल्याचे चित्र सोमवारी दिसले. भारत, इराण, कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही बहुतांश बिगरअमेरिकी प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान या देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आतापर्यंत युरोपीय महासंघातील सर्व सदस्य देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. त्याच वेळी फ्रान्सने ब्रिटनमधून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर तणाव निवळेपर्यंत ४८ तासांसाठी बंदी घातली आहे. या उपाययोजना लांबवल्यास ब्रिटनमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. नव्या उपाययोजनांमागील कारण समजून घेतल्याचे सांगतानाच, ब्रिटनमधील फ्रान्समधील दळणवळण लवकरच सुरळीत होईल, अशी आशा जॉन्सन यांनी व्यक्त केली. व्यापारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही देशांतील अधिकारी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, फ्रान्समध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची विषाणूबाबतची चाचणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे मॅक्रॉन यांनी सांगितले. दरम्यान, युरोपीय महासंघातील २७ देश ब्रिटनबाबतच्या नव्या उपाययोजना शिथिल करण्याचा विचार करीत आहेत. वाचा: फ्रान्सने ब्रिटनमधून येणाऱ्या ट्रकसाठी सीमा बंद केल्याने हजारो ट्रकचालकांना इंग्लिश खाडीचे बंदर असलेल्या डोवर येथे थांबावे लागले. येथील ट्रकची संख्या वाढू लागल्याने त्यातील काही ट्रक मॅनस्टन विमानतळावर पाठवण्यात आले. तेथे चार हजार ट्रक थांबवण्याची क्षमता आहे. डोवर बंदरातून दररोज दहा हजार ट्रक ये-जा करतात. ब्रिटनच्या एकूण मालवाहतुकीपैकी या वाहतुकीचे प्रमाण २० टक्के आहे. इंग्लंडमधील केंट येथे सुमारे दीड हजारांहून अधिक लॉरी अडकून पडल्या आहेत. मालवाहतुकीचा समन्वय साधण्यासाठी तांत्रिक शिफारशी ब्रिटनला पाठवण्याची तयारी युरोपीय महासंघाने केली आहे. कॅनडात ओंटारियो प्रांतात लॉकडाउन करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कॅनडातील ओंटारियो प्रांतात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण ओंटारियो प्रांतात २६ डिसेंबरपासून ते २३ जानेवारीपर्यंत हे लॉकडाउन लागू असेल, तर उत्तर ओंटारियोमध्ये नऊ जानेवारीला लॉकडाउन उठवण्यात येणार आहे. लॉकडाउन तातडीने लागू करण्याऐवजी ख्रिसमसनंतर लागू करण्यात येत असल्याने डॉक्टरांनी या निर्णयावर टीका केली आहे. वाचा: सिंगापूरमध्ये लशीची पहिली खेप दाखल सिंगापूरमध्ये करोनावरील लशीची पहिली बॅच दाखल झाली आहे. फायझर आणि बायोनटेकने तयार केलेली लस दाखल झालेला सिंगापूर हा आशियातील पहिला देश ठरला आहे. सिंगापूरने २०२१च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत देशातील ५७ लाख लोकांना ही लस देण्याचे नियोजन केले आहे. कोव्हिड-१९वरील लशीला मंजुरी देणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये सिंगापूर आहे.